पाचोरा – भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा…

  • आमदार किशोर पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
    पाचोरा ✒️ प्रतिनिधी ( सबला उत्कर्ष ) :-
    पाचोरा – भडगांव मतदारसंघात अचानकपणे वादळी पावसाने भयंकर रौद्ररुप धारण केल्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणुन ओळख असलेले कापुस पिक जमीनदोस्त आडवे झाले आहे. यासोबतच मका, सोयाबीन, मुग, उडीद, चवळी, ज्वारी, बाजरी आदी पिकांचेही पुर्णपणे
    नासधुस होवुन मातीमोल झाली आहे. तसेच लिंबु, मोसंबी, केळी इ.फळबागांचे आतोनात नुकसान झाले. बळीराजाच्या हाती आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे. बळीराजाची परिस्थिती
    अत्यंत दयनीय झालेली असुन “जगावे कि मरावे” असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला
    आहे.
  • सततच्या दुष्काळाच्या तडाख्यात हतबल झालेल्या बळीराजाने पुन्हा कर्ज काढुन खरीपाच्या पिकांची नव्या उमेदीने पेरणी केली होती. कर्जाच्या पाशातून मुक्त होण्यासाठी पांढरे सोने नगदी पिक कापूस मुलाबाळा प्रमाणे जोपासले. दुर्दैवाने आस्मानी संकटामुळे कपाशी पिकाच्या पक्क्या झालेल्या कैऱ्या, फुलपाती पूर्णपणे नष्ट झाली. कपाशीची झाडे जमीनदोस्त झाली. बळीराजाच्या आशेवर पाणी फिरले आहे. कर्ज कसे फेडावे, संसाराचा गाडा कसा चालवावा, आई – बाबांचे औषधोपचार, मुलाबाळांचे शिक्षण व लग्न कसे करावे ? अशा अनेक प्रश्नांनी शेतकऱ्यांचे जीवन निराश व उदास झालेले आहे. अशा भयावह परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे शासनाचे कर्तव्य व जबाबदारी आहे म्हणून कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, चवळी, उडीद, मुग तथा लिंबू, मोसंबी, केळी आदी फळबागांचे तातडीने पंचनामे करुन पाचोरा – भडगांव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन बळीराजाला मोठया प्रमाणात आर्थिक मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना आधार द्यावा. अशा आषयाचे पत्र आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *