पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांचे शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा… पालकमंत्री गुलाबराव पाटील.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश.

शेतकरी, नागरिक व प्रशासनाने दक्ष राहण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन.


           
जळगाव, दि. 24 (सबला उत्कर्ष ) – मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे व इतर नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा व जनतेला दिलासा द्यावा. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
           
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाली आहेत. मोठ्या धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी मुंबई येथून संपर्क करून आढावा घेतला. अवेळी झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांबरोबरच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, मुग, कापूस व इतर पिकांची नासाडी झाली आहे. तर रावेर, यावल भागात केळी बागांचेही नुकसान झाले आहे. याशिवाय काही ठिकाणी नदी, नाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे तसेच नागरीकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्यात यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी सर्व संबंधितांना दिले. 


           
हवामान खात्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने पुढचे काही दिवस पाटबंधारे विभाग तसेच नागरीक, शेतकरी व प्रशासनानेही या काळात दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *