दोन दिवसात उर्दू शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येईल,उर्दू शिक्षक भरती संदर्भात शिष्टमंडळाला प्रशासन अधिकारी दिपाली पाटील यांचे आश्वासन.

दोन दिवसात उर्दू शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येईल

उर्दू शिक्षक भरती संदर्भात शिष्टमंडळाला प्रशासन अधिकारी दिपाली पाटील यांचे आश्वासन.

जळगांव : शिक्षक भरती संदर्भात शासनाने 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 दरम्यान शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) घेण्यात आली. त्यानुसार पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टल या शिक्षक भरतीच्या वेबसाईटवर स्वप्रमाणपत्र तयार करण्याची सूचना करण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांच्या शाळांची जाहिरात सदर वेबसाईटवर 16 ऑक्टोबर 2023 पासून अपलोड करण्याचे 27 ऑक्टोबर 2023 च्या शासन आदेशानुसार आदेशित करण्यात आले. त्या आदेशानुसार अनेक शाळांनी शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. पण अद्याप जळगांव शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे जळगाव शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उर्दू शिक्षकांची नियुक्ती रखळणार असल्याची शक्यता आहे. म्हणून अल्पसंख्यांक समाजाच्या एका प्रतिनिधी मंडळाने सर्वप्रथम महानगरपालिकेचे मा. सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना उर्दू शिक्षकांच्या भरती बाबत एक सविस्तर निवेदन दिले. त्यांच्यानंतर मा. सहाय्यक आयुक्त यांनी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मा. प्रशासन अधिकारी दिपाली पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.
उपरोक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळां मध्ये शिक्षकांच्या रिक्त पदां बाबत जाहिराती पवित्र पोर्टल या वेबसाईटवर अपलोड करण्यात येत आहे. पण दुर्दैवाने जळगांव शहर महानगरपालिकेत उर्दू शिक्षकांच्या जागा रिक्त असतांना सुद्धा अद्याप त्यांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही. यामुळे उर्दू भाषिक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी ही माहिती लवकरात लवकर अपलोड करून शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा करावा.


निवेदन स्वीकारताना मा. प्रशासन अधिकारी दिपाली पाटील यांनी आश्वासन दिले की एक-दोन दिवसातच उर्दू शिक्षकांच्या 17 रिक्त जागा बाबत जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येईल व यामुळे उर्दू शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होईल.
या शिष्टमंडळात जळगांव जिल्हा मन्यार बिरादरीचे फारुक़ शेख, कुल जमातीचे सय्यद चांद, वरिष्ठ पत्रकार व शिक्षक अंजुम रज़्वी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मज़हर पठाण, सेवानिवृत्त शिक्षक साबीर इमदाद, काँग्रेस पक्षाचे अमजद पठाण, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, हुसैनी सेना चे फिरोज शेख, एंजल फूडचे दानियाल शेख, नूर खान बेलदार, राजा मिर्झा आदी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *