यावर्षी फक्त शेतकऱ्यांच्याच भरवशावर देशाची अर्थव्यवस्था, GDPमध्ये 40 वर्षांतील सर्वात मोठी घसरण…


दिनांक : 01-Sep-20
नवी दिल्ली – सबला उत्कर्ष ब्युरो – महामारीच्या काळात भारताचीच नाही, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पहिल्या तिमाहीतील (एप्रिल-जून) अहवाल अत्यंत चिंताजनक आहे. जीडीपीमध्ये 40 वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, ग्रामीण भागातून चांगली बातमी आहे. या वर्षी केवळ कृषी हेच एकमेव असे क्षेत्र आहे, जेथून सकारात्मक ग्रोथची शक्यता दिसून येत आहे. चांगल्या मॉन्सूनमुळे यावेळी कृषी क्षेत्र वाढले आहे. लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजूरही घरी गेले आहेत. यामुळेही शेतीच्या कामाला वेग आला आहे.
० 2019-20च्या पहिल्या तिमाहीत 5.2 टक्यांची तेजी – राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) 2019-20च्या या तिमाहीत 5.2 टक्क्यांची वाढ झाली. सरकारने कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी 25 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन जारी केला. याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या सर्वच स्थरांवर झाला आहे. निर्मिती क्षेत्रात सकल मूल्य वर्धनात (जीव्हीए) 2020-21च्या पहिल्या तिमाहीत 39.3 टक्क्यांची घसरण झाली. तर एक वर्षापूर्वी या तिमाहीत यात 3 टक्क्यांची वाढ झाली होती.
० कृषी क्षेत्रात 3.4 टक्क्यांची वाढ – या काळात कृषी क्षेत्रात 3.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी 2019-20च्या पहिल्या तिमाहीत 3 टक्क्यांची वाढ झाली होती. निर्मिती क्षेत्रात जीव्हीए वृद्धीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 50.3 टक्क्यांची घसरण झाली. तर गत वर्षी याच तिमाहीत 5.2 टक्क्यांची घसरण झाली होती. खान क्षेत्रातील उत्पादनात 23.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर एक वर्षापूर्वी 2019-20च्या याच तिमाहीत 4.7 टक्क्यांची वृद्धी झाली होती. वीज, गॅस, पाण्याचा पुरवठा आणि इतर सेवा क्षेत्रांत 2020-21च्या पहिल्या तिमाहीत 7 टक्क्याची घसरण झाली तर एक वर्षापूर्वी 2019-20च्या तिमाहीत यात 8.8 टक्क्याची वृद्धी झाली होती.
० हॉटेल, परिवहनात 47 टक्क्यांची घसरण : आकडेवारीनुसार, व्यापार, हॉटेल, परिवहन, संचार आणि प्रसारणाशी संबंधित सेवांमध्ये या तिमाहीत 47 टक्क्यांची घसरण झाली, तर एक वर्षापूर्वी याच तिमाहीत 3.5 टक्क्यांची वृद्धी झाली होती. आर्थिक, रिअल इस्टेटमध्ये 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 5.3 टक्यांची घसरण झाली, तर एक वर्षापूर्वी याच तिमाहीत 6 टक्क्यांची वृद्धी झाली होती. लोक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवांतदेखील या तिमाहीत 10.3 टक्क्यांची घसरण झाली होती. तर एक वर्षापूर्वी 2019-20 च्या याच तिमाहीत यात 7.7 टक्क्यांची वाढ दिसून आली होती.
० पहिल्या तिमाहीतील जीडीपी दर 26.90 लाख कोटी – एनएसओने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की ‘स्थिर मूल्यावर (2011-12) जीडीपी 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 26.90 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. हा जीडीपी 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत 35.35 लाख कोटी रुपये एवढा होता. याचाच अर्थ यात 23.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर एक वर्षापूर्वी 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत यात 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती.’ मात्र, चीनच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल-जूनच्या तिमाहीत 3.2 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. यापूर्वी जानेवारी-मार्च, 2020 च्या तिमाहीत 6.8 टक्क्यांची घसरण झाली होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *