भाजपमधून आऊटगोईंग सुरु,२०० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत एन्ट्री !

जळगाव |सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला हादरे देण्याचे काम सुरुच आहेत. भाजपचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावला आहे. जामनेरमधील ‘दोन बस’ भरुन भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून राष्ट्रवादीत पदाधिकारी-कार्यकर्त्ये पक्ष सोडत राष्ट्रवादीची वाट धरताना दिसत आहेत. आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाजपचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आहे.

२ लक्झरी बसेस भरुन भाजप कार्यकर्ते पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील भाजपच्या २०० कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यावेळी उपस्थित होत्या.

काल (२ नोव्हेंबर) जळगावात भाजपच्या ६० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, “आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल”, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी कालच केली होती. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला होता.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *