नगरमध्ये सिनेस्टाइल कारवाई; आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा अलिशान बंगल्याला घेराव…

नगरमध्ये सिनेस्टाइल कारवाई; आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा अलिशान बंगल्याला घेराव.

सबला उत्कर्ष प्रतिनिधी, नगर:- टोलनाक्यावरील दरोड्याच्या गुन्ह्यात टोल कंत्राटदाराला ताब्यात घेण्यासाठी नगरजवळ पाथर्डी रोडवरील एका आलिशान घरावर पोलिसांनी आज भल्या सकाळीच छापा टाकला. मात्र, सर्च वॉरंट नसल्यामुळे पोलिसांना घरांमध्ये जाता आले नाही. याचा फायदा घेत संबंधित आरोपी बंगल्याचे दरवाजे लावून आतमध्ये बसला. त्यामुळे पोलिसांनी या आलिशान घराला घेराव घातला. दरम्यान, दुसरीकडे आरोपीने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्याची न्यायालय सुनावणी सुरू आहे. पोलिसांच्या सुरू असलेल्या या कारवाईची मात्र नगर शहरासह जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
भिंगार परिसरात असणाऱ्या ‘स्वामी रेसिडेन्सी’ या घरावर आज सकाळी सात वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी हा फौजफाटा आला. मात्र याची कुणकुण लागताच संबंधित आरोपीने आपल्या बंगल्याचे दरवाजे लावून घेतले व तो आतमध्ये बसला. त्यावेळी पोलिसांनी हे दरवाजे तोडण्यासाठी तयारी केली. मात्र तेथे काही महिला कार्यकर्त्या आल्या व त्यांनी तुमच्याकडे ‘सर्च वॉरंट’ आहे का? अशी विचारणा केली. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडण्याचे काम थांबवत कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दुसरीकडे आरोपीनेही घरामध्ये बसल्याबसल्या सूत्रे हलवून कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले. तिकडे त्यावर सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे पोलिसांची कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आता न्यायालयात काय होणार ? याकडे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे अद्यापही दुपारी पोलीस बंगल्याला घेराव घालून उभे आहेत. आता नेमके पुढे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
बोठे लपल्याच्या चर्चेला उधाण
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे हा पसार आहे. बोठे हाच भिंगार येथील या आलिशान बंगल्यामध्ये असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे एवढा मोठा फौजफाटा येथे दाखल झाल्याचे बोलले जाऊ लागले. प्रत्यक्षात ही वेगळी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही बंगल्यातून नेमकं कोणाला ताब्यात घेतले जाते, याकडेही लक्ष लागले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *