*राज्यपाल नियुक्त सदस्यासाठीचे (विधान परिषद आमदार) निकष कोणते?*


मुंबई : सबला उत्कर्ष न्यूज नेटवर्क :-
राज्यपालांना या नियुक्त्या करण्याचे अधिकार घटनेने दिलेले आहेत. कलम 163 (1) खाली राज्यपाल या नियुक्त्या करू शकतात.
राज्याचे माजी महाधिवक्ते अॅडव्होकेट श्रीहरी अणे सांगतात, “राज्यघटनेत असं म्हटलेलं आहे की, राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने या नियुक्त्या कराव्यात. *पण ज्याठिकाणी राज्यपालांना एखादी नियुक्ती योग्य वाटत नसेल, तर त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ती करण्याची गरज नाही. राज्यपालांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे.”*

ते पुढे सांगतात “जर नियुक्त्यांबाबत बोलायचं झालं तर घटनेच्या कलम 171 (3) नुसार राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या सदस्यांची नियुक्ती करता येते, अशी तरतूद आहे. कलम 171 (5) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते. या क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्त्या करताना मंत्रिमंडळाचं ऐकावं की नाही, याबाबत जरी वाद असला तरी घटनेने राज्यपालांना दिलेल्या अधिकारानुसार त्यांनी ते काही कारणास्तव नाही ऐकलं तर चूक होईल असं मला वाटत नाही.”
मग राज्यपालांना मंत्रिमंडळाने सुचवलेल्या नावांमध्ये एखादं नाव या पाच क्षेत्राशी संबंधित वाटलं नाही, तर ते नाव फेटाळलं जाऊ शकतं. मग ती जागा रिक्त राहणार का? की राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्याविना स्वत:च्या अधिकारात एखाद्या सदस्याची नियुक्ती करू शकतात, असा प्रश्न उपस्थित होतो.
त्याबाबत अॅडव्होकेट श्रीहरी अणे सांगतात “राज्यपालांना तो अधिकार आहे. पण राज्यपाल घटनाबाह्य कोणतीही नियुक्ती करू शकत नाहीत. म्हणजेच साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार ही क्षेत्र वगळता इतर क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करू शकत नाहीत.”
यासंदर्भात राज्यपालांच्या विरोधात राज्य सरकारला कोर्टात जाता येईल का, हा प्रश्न सुद्धा आम्ही श्रीहरी आणेंना विचारला.
त्यावर ते म्हणतात, “हा वाद कोर्टात नेता येत नाही. राज्यपालांचा निर्णय हा अंतिम असेल असं जरी घटनेत लिहीलं नसलं तरी राज्यपालांच्या निर्णयाचं पारडं हे सरकारपेक्षा जड असणार्‍या तरतूदी घटनेत केलेल्या आहेत. तसंच आतापर्यंतच्या सुप्रीम कोर्टाच्या तीन सुनावण्यामध्ये कोर्टानं म्हटलेलं आहे की, राज्यपाल स्वतःच्या अधिकारात काही गोष्टी करू शकतात; पण त्या घटनाबाह्य नसाव्यात.’_

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *