बालिकेच्या मृत्यूला कारणीभूत मांस विक्री बंद करा अन्यथा उपोषण; दिला इशारा…

नंदुरबार- शहरात सर्रास विनापरवानगी उघड्यावर मांस विक्री होत असल्याने.

नंदुरबार- सबला उत्कर्ष ( सतिष तायडे ) :- शहरात सर्रास विनापरवानगी उघड्यावर मांस विक्री होत असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली. अशाच कुत्र्याने चावा घेतल्याने पाच वर्षाच्या बालिकेला जीव गमवावा लागला. म्हणूनउघड्यावरील मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अन्यथा १४ डिसेंबरपासून नगरपालिकेसमोर उपोषण करु, असा इशारा मयत बालिकेच्या पालकांसह हिंदु सेवा सहाय्य समितीने दिला आहे.
यासंदर्भात नगरपालिकेच्या मुख्याधिऱ्यांना आज सोमवार दि.7 रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनावर डॉ. नरेंद्र पाटील, मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, काका राजेश महाजन, चेतन राजपूत, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, जितेंद्र मराठे, गौरव धामणे, कुणाल शिंपी यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील जवळ जवळ सर्वच चौकांमध्ये उघड्यावर चिकन- मटणाचे पदार्थ बनवून विक्री करणाऱ्या गाड्या रोज ऊभ्या असतात. त्यांच्याकडील मांसाचे व हाडांचे तुकडे, चिकन- मटणाचे पदार्थ ग्राहकांच्या प्लेटमध्ये शिल्लक राहतात. त्या परिसरातील कुत्रे खातात. त्यामुळे त्यांना ज्यादिवशी मांस, हाडे मिळत नाही तेव्हा ते मनुष्य, वराहांवर आक्रमण करतात. असाच प्रकार शहरातील वीर सावरकरनगर येथील पाच वर्षीय हिताक्षी मुकेश माळी बाबत घडला. तिला अशा कुत्र्याने चावा घेतला व ती उपचारा दरम्यान मरण पावली. शहरातील प्रत्येक वस्ती किंवा कॉलनीमध्ये मोकाट कुत्र्यांच्या त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नंदुरबार नगर परिषदेच्या रेकॉर्डप्रमाणे उघड्यावरील मांस विक्री करणारया एकाही दुकानाला अथवा गाडीला नगरपालिकेने परवानगी दिलेली नाही. याचाच अर्थ ही सर्व दुकाने बेकायदेशीर आहेत. या बेकायदेशीर दुकानांवर त्वरित कारवाई करून त्यांना बंद करण्यात यावे. मृत्युमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी मुकेश माळी हिचा मृत्यूला कारणीभूत असलेल्या ठेकदाराचा ठेका रद्द करण्यात यावा, मोकाट कुत्र्यांना रेबीज इंजेक्शन देणे तसेच नसबंदी कार्यक्रम त्वरित राबवण्यात यावा. गुरांप्रमाणेच मोकाट कुत्र्यांसाठीही कोंडवाळा तयार करावा. या मागण्या १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास १४ डिसेंबरपासून नंदुरबार नगर परिषदसमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *