कामगारांना भीती नोकरी गमावण्याची…

कामगारांना भीती नोकरी गमावण्याची.

करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या काळात कामगार कपात, पगाराला कात्री, कायम कामगारांऐवजी कंत्राटी कामगारांची भरती, सक्तीच्या बिनपगारी रजा…

पुणे : सबला उत्कर्ष प्रतिनिधी – अशा विविध कामगारविरोधी निर्णयांचा मोठा फटका संघटित कामगार वर्गाला बसला.
कंपन्याही आर्थिक अडचणीत असल्याने कामगार जगविण्याची त्यांची क्षमताही संपली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन केल्यास कंपन्या आणि कामगार वर्ग आर्थिक संकटांच्या खाईत लोटला जाईल,’ अशी भीती संघटित कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील संघटित उद्योग गेल्या काही वर्षांपासून आर्थिक मंदीचा सामना करीत आहे. त्यातच करोना संकट आणि त्या पाठोपाठ आलेल्या लॉकडाउनमुळे उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. त्याही परिस्थितीत काही कंपन्यांनी सरकारच्या सूचनांचे पालन करून कायम कामगारांना पगार दिले. काही कंपन्यांनी या संकटाचा फायदा घेऊन कायम कामगारांना कपातीच्या नोटिसा देणे, ‘नो वर्क-नो पे’, पगारात ७० टक्क्यांपर्यंत कपात असे निर्णय घेतले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांची शिक्षणे, घरासह विविध कर्जांचे हप्ते फेडताना कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली. अनलॉकनंतर संघटित उद्योग हळूहळू पुन्हा रुळावर येत आहे. त्यामुळे कामगारांनाही उभारी मिळत आहे. अशा वेळी पुन्हा लॉकडाउन नको. त्याऐवजी कंपन्यांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी भूमिका कामगार संघटनांनी मांडली.
लॉकडाउनच्या काळात आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार २२ टक्के आयटी कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या. ३१ टक्के आयटी कामगारांना पगार कपातीमुळे अर्धवट बेरोजगारीचा सामना करावा लागला. नोकरी गमावण्याची भीती, वेतनात कपात, विलंबित वेतनवाढीमुळे कामगारांना निद्रानाश, अस्वस्थता, पाठदुखी, ताणतणाव अशा विविध दुष्परिणामांना आयटी कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवनातील सीमारेषा अदृश्य झाली. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाउन करण्यापेक्षा राज्य सरकार आणि आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांप्रती सहानुभूती दर्शवली पाहिजे,’ असे मत नैसेन्ट इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटच्या (नाइट्स) हरप्रीत सलुजा यांनी मांडले.
कामगारांना पूर्वकल्पना न देता अचानक लॉकडाउन करण्यात आला. त्याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. त्याचा मोठा फटका कामगारांना बसला. अनलॉकनंतरही कंपन्या कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेता दिसत नाही. आता पुन्हा लॉकडाउन केल्यास रुळावर येत असलेल्या अर्थव्यवस्थेला खीळ बसेल आणि त्याचा विपरीत परिणाम कामगारांच्या नोकऱ्यांवर होईल. त्यामुळे लॉकडाउनला आमचा विरोध आहे. – अनिल रोहम, आयटक .

लॉकडाउनच्या काळात संघटित कामगारांना घरी थांबावे लागले. त्या कालावधीचे वेतनही त्यांना देण्यात आले. मात्र, ते कामावर गेल्यानंतर अनेक ठिकाणी रिट्रेंचमेंटच्या नोटिसा देण्यात आल्या. कायम कामगारांच्या जागी कंत्राटी कामगारांची भरती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघटित कामगारांवर त्रासदायक असलेल्या अटी व्यवस्थापनाकडून लादल्या जात आहेत. अशा वेळी पुन्हा लॉकडाउन केल्यास अनेक कंपन्या कामगार कपात करतील. – अजित अभ्यंकर, सिटू .

आधीच आर्थिक मंदीमुळे कंपन्या व कामगार अडचणीत आहेत. करोना संकटकाळात काही कंपन्यांनी त्यांच्या कामगाराना आधार दिला. ठरावीक कंपन्यांनी संकटांचा फायदा घेऊन कामगारांना पगारच दिले नाहीत किंवा कामगारांना काढून टाकले. त्यामुळे तुटपुंज्या उत्पन्नात लॉकडाउनच्या काळातील महागाईला तोंड देताना कामगार मेटाकुटीला आले. त्यातच सरकारनेही कामगार कायदे बदलले आहेत. आता पुन्हा लॉकडाउन कामगार वर्गाला परवडणारे नाही. – किशोर ढोकले, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *