अमळनेर तालुक्यात विवाहितेला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा…

अमळनेर तालुक्यात विवाहितेला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा.

अमळनेर : सबला उत्कर्ष न्युज ( मयूर वागूळदे ) :- तांदळी ता.अमळनेर येथील प्रेमविवाह झालेल्या विवाहितेला पतीसह सासरकडील लोकांनी जबर मारहाण करून संगनमताने डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना २२ ऑक्टोबरला घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध विविध १० कलमांन्वये गुन्हा दाखल झाला. डीवायएसपी राकेश जाधव, एपीआय राहुल फुला यांनी रात्रीच तांदळी गाठून घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला.

तांदळी येथील अश्विनी नीलेश परदेशी (वय १९) हिचा ५ महिन्यांपूर्वी गावातील तरुणासोबत प्रेमविवाह झाला. ती सासरकडे एकत्र कुटुंबात राहत होती. मात्र, जेठाणी व सासरकडील लोकांना हा प्रकार खटकत असल्याने वारंवार टोचून बोलणे, मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. त्यातूनच २१ ऑक्टोबरच्या रात्री पती व जेठाणीसोबत वाद झाले.

गुरुवारी सकाळी पुन्हा वाद उफाळून जेठाणीने अश्लील शिवीगाळ सुरू केली. विवाहितेच्या पतीने देखील तिला दंडुक्याने मारहाण केली. यानंतर सासू व जेठाणीने धरून ठेवले, तर पतीने लाथाबुक्याने मारहाण केली. पतीने ट्रॅक्टरसाठी आणलेले डिझेल अंगावर ओतून जाळून मारण्याचा उद्देशाने फ्रिजवरील आगपेटी आणून पुतण्याला फोटो काढावयास सांगितले.

या सर्वांपासून सुटका करून महिलेने ओट्यावर पळ काढला. यानंतर पतीने दोन मित्रांच्या मदतीने तिला गावातीलच तिच्या आई-वडिलांकडे सोडले. त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर विवाहितेने परिचिताच्या मदतीने मारवड पोलिस ठाणे गाठून एपीआय राहुल फुला यांना आपबिती कथन केली.

यानंतर तिच्या फिर्यादीवरून पती नीलेश प्रतापसिंग परदेशी, जेठाणी आशाबाई उदेसिंग परदेशी, सासू देवकाबाई प्रतापसिंग परदेशी, अजय मधुकर परदेशी (सर्व रा.तांदळी) व पतीचा मित्र भैया उर्फ नीलेश राजेंद्र पाटील (रा.गोवर्धन) यांचेविरूद्ध संगनमताने जीवे मारण्याचा, शारीरिक व मानसिक छळ करणे आदी १० कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *