शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रभावीपणे राबविणार…

शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रभावीपणे राबविणार

आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

जात व अन्य प्रमाणपत्रांपासून कोणीही वंचित राहू नये

खमनचेरु येथे जात प्रमाण पत्राचे वाटप

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ( सबला उत्कर्ष न्युज ) :-

अहेरी:– माझ्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत शासन आपल्या दारी हा उपक्रम अहेरी उपविभागात अव्वल ठरला होता, आता या पुढेही “शासन आपल्या दारी” हा अभिनव उपक्रम अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते शुक्रवार 23 ऑक्टोंबर रोजी अहेरी तालुक्यातील खमनचेरु येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी तर्फे वेध भविष्याचा उपक्रमा अंतर्गत अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात उदघाटन स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता होते. तर विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीकांत धोटे, माजी जि. प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.


उदघाटनीय स्थानावरून बोलतांना आ.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेणे व राबविणे अत्यावश्यक असून त्या करिता महत्वाचे व प्रामुख्याने जात प्रमाणपत्रे अनिवार्य असल्याने आदिवासी समाजाच्या प्रत्येकांकडे जात प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट) असावे या करिता माझी धडपड सुरू असून खंड पडलेले “शासन आपल्या दारी” हा उपक्रम अजून यापुढे जोमाने व प्रभावीपणे राबविणार असल्याचे आवर्जून सांगितले.
पुढे त्यांनी अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे मोठ्या आत्मविश्वासाने सांगून दाखल्यांपासून कोणीही वंचित राहू नये व प्रत्येकांनी जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे, वनजमिनीच्या पट्टयासंदर्भात लागणारे दस्तावेज यांची जुळवाजुळव करून शासनाकडे प्रस्ताव सादर करून प्रमाणपत्र मिळवून घ्यावे व शासनाच्या विविध योजना, सोयी-सवलतीचा लाभ घ्यावे व आपली उन्नती साधावे असे आवाहन यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी करून नागरिकांनी शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याचेही अपेक्षा व्यक्त केले. उल्लेखनीय म्हणजे कोरोनाच्या बचावासाठी सर्वांनी योग्य काळजी व खबरदारी घ्यावे याकडेही लक्ष वेधले.
याचप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता यांनी ‘वेध भविष्याचा’ उपक्रमा अंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना जातीचे दाखले वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबवित असल्याचे सांगून मोलाचे मार्गदर्शनही केले.


तत्पूर्वी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थी व पालकांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मारोती बलकी तर आभार रतन करमनकर यांनी मानले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *