भुसावळात ओटीपी विचारून ऑनलाईन चोरट्यांचा दोन लाखाचा लावला चुना…

बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल….

भुसावळ : सबला उत्कर्ष न्युज ( मयूर वागूळदे ) :- बँकेत पेन्शन अपडेट करायचे आहे, त्यामुळे तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, असे सांगून भामट्याने ओटीपी मिळवत पाटबंधारे खात्यातील निवृत्ताच्या बँक खात्यातून २ लाख ६ हजार रुपये परस्पर काढून घेतले. २६ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली, याप्रकरणी मंगळवारी रात्री बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शहरातील जामनेर रोडवरील रहिवासी तथा पाटबंधारे खात्यातील निवृत्त कर्मचारी बळीराम दुलगज (वय ७१) यांना १९ सप्टेंबरला मोबाईलवर भामट्याने फोन केला. मी बँकेतून बोलत आहे, आपल्या मोबाईल वर आलेला आठ अंकी ओटीपी मला सांगा, आपले पेन्शन अपडेट करायचे आहे, असे भामट्याने सांगितले. त्यावेळी दुगलज यांनी ओटीपी नंबर हातावर लिहून घेतला.

तसेच दुसऱ्या वेळेस भामट्याने फोन केल्यावर त्यांनी ओटीपी त्याला सांगितला. त्यानंतर दुगलज यांच्या खात्यातून १९ सप्टेंबरला १ लाख ६ हजार रुपये, तर २० सप्टेंबरला एकदा ५० हजार आणि दोनवेळा प्रत्येकी २५ हजार रुपये काढण्यात आले. २६ सप्टेंबरला दुगलज हे बँकेत गेले, त्यावेळी त्यांच्या खात्यातून २ लाख ६ हजार रुपये काढून घेतल्याचे लक्षात आले. बँकेच्या व्यवस्थापकांनी याबाबत त्यांना माहिती दिली.

बँक व्यवस्थापकांनी या प्रकरणाची चौकशी करून दुलगज यांना फसवणुकीचा प्रकार सांगितला. तसेच पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार द्यावी असा सल्ला दिला. त्यामुळे दुगलज यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांची भेट घेऊन त्यांना घटना सांगितली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला. बाजारपेठ पोलिस पुढील तपास करत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *