भाऊबीजेच्या दिवशी विष घेतल्याने बहिणीचा मृत्यू…

भाऊ अत्यवस्थ; भोलाण्याची धक्कादायक घटना

जळगाव : सबला उत्कर्ष ( मयूर वागूळदे ) :- मुंबईत शिक्षण घेत असलेल्या भाऊ-बहिणींनी अभ्यासाच्या तणावातून आलेल्या नैराश्यामुळे ऐन भाऊबीजेच्या दिवशी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात बहिणीचा मृत्यू झाला तर भाऊ अत्यवस्थ आहे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता भोलाणे (ता. जळगाव) येथे ही घटना घडली.

अश्विता विजय कोळी (सपकाळे, वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर तिचा मोठा भाऊ विश्वजित (वय २२) हा अत्यवस्थ आहे. त्यांचे वडील निवृत्त बसवाहक आहेत. तर सध्या भोलाणे येथे शेती करीत आहेत. अश्विता व विश्वजित हे दोघे उल्हासनगर (मुंबई) येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तेथेच वडिलांनी घेऊन दिलेल्या घरात दोघे राहत होते. अश्विता प्रथम वर्ष विज्ञान शाखा तर विश्वजित शेवटच्या वर्षाला होता.

लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महाविद्यालय बंद झाले. यानंतर दोघे जण मूळ गावी भोलाणे येथे आले. दरम्यान, आता महाविद्यालयाचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या ऑनलाइन पद्धतीमुळे त्यांचे अभ्यासात मन लागत नव्हते. अनेक विषयांचे ज्ञान व्यवस्थित मिळत नव्हते. त्यामुळे दोघेजण नैराश्यात आले होते.

दरम्यान, १६ रोजी भाऊबीजेच्या दिवशी रात्री १० वाजता दोघांनी राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने ते अत्यवस्थ झाले. हा प्रकार लक्षात येताच वडिलांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच अश्विताचा मृत्यू झाला. यानंतर विश्वजित याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.

विश्वजितचा जबाब घेतला
अश्विताच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहेबराव पाटील तपास करीत आहेत. पोलिसांनी विश्वजित याचा जबाब नोंदवला आहे. अभ्यासाच्या तणावातून नैराश्य आले. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला, असा जबाब त्याने पोलिसांना दिला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *