स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्तेसाठी संघटन महत्वाचे – ना. गुलाबराव पाटील…


स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्तेसाठी संघटन महत्वाचे –
ना. गुलाबराव पाटील…

४ लाख सभासद नोंदणीचे उद्दीष्ट; गावांमध्ये एकाच वेळी होणार फलक अनावरण

धरणगाव प्रतिनिधी,धनराज पाटील :- येत्या वर्षभरात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेपासून जिल्हा बॅकेपर्यंत विविध स्थानिक निवडणुका येत्या वर्षात आहेत या संस्थांवर आपल्याला आपली सत्ता आणायची असेल तर आपल्याला आहे त्यापेक्षा संघटन मजबूत करावे लागेल. सत्ता ही संघटनेवर अवलंबून असल्याने जिल्हाभरात शिवसेनेचे ४ लाख सदस्य नोंदविण्याचे उद्दिष्ट पुर्ण करा असे आवाहन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. आज अजिंठा विश्रामगृहात पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत ते बोलत होते.

आज अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेची संघटनात्मक जिल्हा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, गोपाळ चौधरी,रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे व नंदलाल पाटील , युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सुत्रसंचलन व प्रास्ताविक विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी केले. तर आभार महानगर प्रमुख शरद तायडे यांनी मानले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेत आपली सदस्य संख्या १५ पेक्षा अधिक नाही. ज्या ठिकाणी आमदार आहेत, तेथेच हे सदस्य निवडून येतात, त्यामुळे यापुढच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात आपले आमदार नाहीत, अशी ठिकाणे टार्गेट ठेवून काम करावे लागणार आहे. येत्या वर्षात निवडणुका अधिक असल्याने त्या ठिकाणी पक्षसंघटना वाढविणे, ४ लाख सदस्य नोंदणी करावे. या करता पोलीओ निर्मुलनासाठी लावण्यात येणार्‍या शिबीरांप्रमाणे सभासद नोंदणीचे शिबीरे लावली पाहीजे.

ना. पाटील पुढे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत विजयामुळे महाविकास आघाडीची ताकत दिसून आली आहे. भाजपला थोपविण्यासाठी स्थानिक निवडणुकीत देखील हे प्रयोग केले जाणार आहेत. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी शेतकर्‍यांच्या डीपी दुरूस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. आमदार चिमणराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४० जागा आपण जिंकू शकतो असा विश्‍वास व्यक्त केला. जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रास्ताविकात पक्षसंघटनेची स्थिती आणि आगामी निवडणुकीतील संधी याबाबत सांगत सभासद नोंदणीचा कार्यक्रम नियोजन सांगितले

शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफार्मर येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ट्रान्सफार्म दुरूस्ती आणि ऑईलसाठी जिल्हा नियोजन समितीतून नाविण्यपुर्ण योजनेतून लागणारा ६० लाखाचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यामुळे ट्रान्सफार्मरची वेटींग कमी होवून शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

फटाके फोडून जल्लोष…….

विधान परिषद निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल यावेळी रस्त्यावर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *