बीएचआर प्रकरणी एक ट्रक पुरावे…

पुणे : सबला उत्कर्ष ( मयूर वागूळदे ) :- भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणांहून एक ट्रक भरून पुरावे गोळा केले आहेत. जळगावमध्ये वेगवेगळ्या १२ व औरंगाबाद येथील तीन अशा १५ ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे.
बीएचआर प्रकरणात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने संपूर्ण गुप्तता पाळली होती. या प्रकरणी डेक्कन, पिंपरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे तीन गुन्हे दाखल आहेत. या कारवाईसाठी दोन पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, २५ सहायक निरीक्षक आणि १०० पोलिस कर्मचारी असा पुणे, पिंपरी आणि ग्रामीण पोलिसांच्या या मोठ्या पथकाने जळगावमध्ये मागच्या शुक्रवारी सकाळीच छापा टाकला होता. त्यात जळगावमधील १२ ठिकाणी एकाच वेळी छापे घालण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीवरून इतर ठिकाणी; तसेच औरंगाबाद येथे तपासणी करण्यात आली. या सर्व ठिकाणांवरून एक ट्रक भरून मिळालेली कागदपत्रे व डिजिटल वस्तूंची छाननी सध्या सुरू आहे. त्यामध्ये ठेवीदारांच्या पावत्या, कर्जदारांची शपथपत्रे, अनेक बनावट शिक्के असे साहित्य आहे. त्यातील कोणत्या बँकेची दस्तऐवज आहेत? कोणत्या आरोपींनी बेकायदेशीरपणे लोकांकडून कागदपत्रे करून घेतलेली आहेत? ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. तसेच, अटक केलेल्या आरोपीचे जबाब नोंदवून घेण्याचे कारण स्वतंत्र पथक करीत आहेत. या सर्व कागदपत्रांची छाननी करून त्याचा पुरावा म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने आणखी काही दिवस लागणार आहेत.

ठेवीदारांकडून पुणे पोलिसांच्या कारवाईचे स्वागत
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केल्यानंतर बीएचआरचे ठेवीदार, गुंतवणूकदार, ग्राहक यांच्याकडून जोरदार स्वागत केले जात आहे. ‘गेल्या दोन वर्षांपासून आम्ही यामध्ये न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करीत आहोत. पोलिसांच्या कारवाईने आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा वाटत आहे,’ असे ठेवीदारांनी सांगितले. बीएचआरशी संबंधित अनेक जण आर्थिक गुन्हे शाखेत येऊन पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करीत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *