पोलीस निरीक्षक विठ्ठल ससेंनी पिडीत महिलेसह मला अश्लील शिवीगाळ केली ; सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टेंचा आरोप…

पोलीस निरीक्षक विठ्ठल ससेंनी पिडीत महिलेसह मला अश्लील शिवीगाळ केली ; सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टेंचा आरोप.

जळगाव (प्रतिनिधी) मयुर वाघुळदे :- सबला उत्कर्ष न्यूज – एका पिडीत महिलेच्या अन्यायासंबंधी दाद मागण्यासाठी पोलीस स्थानकात गेल्यावर आज शनिपेठचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी आपणास व अन्यायाग्रस्त तरुणीस अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टे यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पोलीस निरीक्षक ससे यांच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तसेच ससे यांना निलंबित न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील झाल्टे यांनी दिला आहे. दरम्यान, झाल्टे यांनी यासंदर्भात एक फेसबुक लाईव्ह करत गृहमंत्री तसेच खा. सुप्रियाताई सुळे यांना टॅग केले आहे.

याबाबत वैशाली झाल्टे यांनी म्हटले आहे की, अन्यायग्रस्त महिला ही वैशाली झाल्टे यांच्याकडे तक्रार घेवून आल्या होत्या. त्यानुसार दोन वर्षापूर्वी तिला एका मुलाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केले. दोन वर्ष ते एकत्रित राहिले. परंतु दोन वर्षानंतर तिला सोडून निघून गेला. ती महिला पोलीस स्टेशनला सुद्धा गेली. पण पोलिसांनी तिला हाकलून लावले. त्यानंतर ती माझ्याकडे आली. त्यानुसार अन्यायग्रस्त महिलेला घेऊन शनिपेठ पोलीस स्टेशनला गेल्यावर तेथे अगोदरच या महिलेची सासू पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या दालनात उपस्थित होती.

वैशाली झाल्टे यांनी पोलिस निरीक्षक ससे यांना सांगितले की, सदर महिलेचे त्या मुलासोबत लग्न झालेले आहे. आपण मुलाला आणि त्यांच्या कुटुंबियांना मुलीला सन्मानाने घरी न्यायावयास समज द्या. परंतु पोलिस निरीक्षक ससे हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिस निरीक्षक ससे हे झाल्टे यांना म्हणाले की, ही मुलगी दोन वर्ष त्या मुलासोबत राहिली म्हणजे त्याची बायको झाली का?. त्या मुलाचा एक महिन्यापूर्वी साखरपुडा झाला आहे. या महिलेचा त्या मुलाशी काहीही संबंध नाही. त्यावर झाल्टे म्हणाल्या की, खरं तर तुम्ही चौकशी केल्याशिवाय त्यांची बाजू घेऊन बोलू शकत नाही. तुम्ही अगोदर तक्रार नोंदवून घ्या. तपासानंतर आपल्याला कळेल की, काय खरं आणि काय खोटं?. यावर पोलीस निरीक्षक ससे हे वैशाली झाल्टे यांना म्हणाले की, तू जास्त शहाणपण करू नको. तुच जास्त माजलेली दिसतेस एका मिनिटात तुझा माज मी उतरवून टाकीन. एवढेच नव्हे तर अश्लील शिवीगाळ केली, असा आरोप झाल्टे यांना केला आहे.

हा सर्व प्रकार झाल्यावर पोलीस निरीक्षक ससे यांनी महिलेची कोणतीही तक्रार नोंदवून न घेता आपल्या कार्यालयाला कुलूप लावून निघून गेले. झाल्टे म्हणाल्या की, पोलीस स्टेशन मध्येच महिलांना अशी वागणूक मिळत असेल तर इतरांकडून काय अपेक्षा करणार? पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे सारख्या लोकांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलीम होत आहे. त्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे. जर निलंबित केले नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा वैशाली झाल्टे यांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक श्री. ससे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सीसीटीव्ही फुटेज तपासा

माझे पोलीस अधीक्षकांना आवाहन आहे की, कदाचित हा प्रकार खोटा आहे, असे वाटत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. तसेच मला अशी शंका आहे की, पोलीस निरीक्षक यांना ‘त्या’ मुलाच्या आई-वडील किंवा बहीणकडून पैसे घेतले असल्याचा आरोप देखील झाल्टे यांनी केला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *