पुणे: हॉटेल मालकावर गोळीबार; पळून जाताना हल्लेखोर दुचाकीवरून पडले पण…

पुणे: हॉटेल मालकावर गोळीबार; पळून जाताना हल्लेखोर दुचाकीवरून पडले पण…

सबला उत्कर्ष ऑनलाइन
हॉटेल मालकावर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील वेल्हे तालुक्यातील दापोडे येथे ही घटना घडली. तिघे हल्लेखोर पसार झाले. जखमी हॉटेल मालकाला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले आहे.

सबला उत्कर्ष वृत्तसेवा, भोर: वेल्हे तालुक्यातील दापोडे येथे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तीन अज्ञात तरूणांनी केलेल्या गोळीबारात हॉटेल मालक गंभीर जखमी झाला आहे. विलास नथू बोरगे (वय ४०, रा.करंजावणे ) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गोळीबार करून तिघेही हल्लेखोर फरार झाले आहेत. वेल्हे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगे हे व्यवसायामुळे दापोडे येथे राहत होते. गावाजवळ रस्त्यालगतच त्यांचे हॉटेल आहे. सकाळी हॉटेल उघडून ते दारात उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून मास्कने पूर्ण तोंड झाकलेले वीस ते पंचवीस वयोगटातील तीन तरूण तेथे आले. त्यांनी बोरगे यांच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये बोरगे जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना गावातील रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टर भीमराव शेंडकर यांना बोरगे यांच्या छातीत गोळ्या घुसल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ १०८ क्रमांकाला फोन करून रुग्णवाहिका मागवली. त्यानंतर बोरगे यांना पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले.
दरम्यान, तिघेही तरूण कुसगाव खिंडच्या दिशेने पळून गेले. त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते. पळून जाताना वाटेत दुचाकी घसरल्याने ते पडले. मात्र पुन्हा गडबडीने उठून शिवापूरच्या दिशेने गेले. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांनी सांगितले. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे देवकर यांनी सांगितले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *