नंदुरबार – भटक्या कुत्र्यांनी अखेर पुन्हा एका लहान मुलीचा बळी घेतला…

नंदुरबार : सबला उत्कर्ष ( सतिष तायडे ) :- नंदुरबार शहरात दोन वर्षांपूर्वी देखील लहान मुलाचा बळी गेला होता. कुत्र्यांच्या चाव्यामुळे मुलीने प्राण गमावल्यानंतर नंदुरबार नगरपालिका खडबडून जागी झाली असली तरी विक्रेत्यांनी बेजबाबदारपणे उघड्यावर फेकून दिलेल्या मांसाचे तुकडे खाण्यासाठी जमणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नंदुरबार शहरातील नेहरूनगर भागात राहणाऱ्या महाजन परिवारातील कुमारी हिताशी महाजन या सहा वर्षीय बालिकेला भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले. गल्लीत खेळणाऱ्या बालिकेला कुत्र्यांच्या झुंडी मध्ये जखमी झालेले पाहून भोवतालचे लोक धावून आले. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचार चालू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेने शहरवासी संतप्त झाले आहेत. नगरपालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त का करू शकत नाही असा प्रश्न केला जात आहे. भारतीय जनता पार्टी चे विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर हे दोन वर्षापासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न उचलत आहे. निर्बीजीकरण आवश्यक असताना आणि शासकीय निधी खास त्यासाठी दिला जात असताना नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यापूर्वी त्यांनी साधारण सभेत देखील केला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाने कधीही हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही.
दरम्यान नंदुरबार शहरातील साक्रीनाका ते मच्छीबाजार दरम्यान काही विक्रेत्यांकडून उरलेल्या माणसाचे तुकडे फेकले जातात. त्या फेकलेल्या मांसांचे तुकड्यामुळे दूरपर्यंत दुर्गंधी व अस्वच्छता पसरते. शिवाय शेकडो कुत्र्यांचे झुंड नेहमी त्या भागात फिरत असतात. या भटक्या कुत्र्यांची दहशत असल्यामुळे सामान्य मनुष्य तिकडे फिरकु सुध्दा शकत नाही. दैनंदिन कामासाठी वावरणे भाग असलेल्या त्या भागातील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. भटक्या कुत्र्यांची या परिसरात दहशत असल्याविषयी स्थानिक नगरसेवकांनी वारंवार लेखी निवेदने व तोंडी सुचना दिल्या. त्या उपरांतही कार्यवाही झालेली नाही. आता मात्र कुत्र्यांमुळे एका सहा वर्षाच्या लहान बालिकेने जीव गमवल्यानंतर नंदुरबार नगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. त्यांनी तिथे साफसफाई करत चार कर्मचारी नियुक्त केले. मांस किंवा घाण फेकणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या नोटीसा बजावणार असल्याचे आश्वासन दिले आहे. वास्तविक नगरपालिकेत भटक्या कुत्रे, डुकरे, जनावरे यांच्याविषयी कोणतीही कार्यवाही केली जात नाही. तसे न करताच कागदोपत्री घोडे नाचवत लाखो रूपयांची बिले काढली जातात, असा आरोप विरोधकांनी केला आहे. जर खरोखर कामे झाली असती तर या मुलीला जीव गमवावा लागला नसता; असा आक्षेपही विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी घेतला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *