अमळनेर बीडीओसह ६ जणांवर खंडणीचा गुन्हा…

अमळनेर : दिपक सूर्यवंशी ( सबला उत्कर्ष ) :- वैयक्तिक शौचालय योजनेत एक लाखाची खंडणी मागणे, सरपंचपदाचा कालावधी नसताना मठगव्हाण येथील सरपंचावर अपहाराचा आरोप करून त्यांच्या अपात्रतेचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर गटविकास अधिकारी, दोन विस्तार अधिकाऱ्यांसह सहा जणांवर मंगळवारी खंडणी, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

मठगव्हाण (ता.अमळनेर) येथील तत्कालीन सरपंच मायाबाई प्रवीण वाघ यांनी ३० नोव्हेंबरला तक्रार दिली होती. त्यात त्या २२ फेब्रुवारी २०१८ पासून सरपंचपदाचा कारभार पाहत होत्या. गावातील अडचणी, कर वसुली व विकास कामांसाठी बीडीओंनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा सोशल मीडियाचा ग्रुप तयार केला होता. ४ डिसेंबर २०१९ रोजी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम कामाबद्दल वर्गणीच्या नावाखाली १ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे सरपंच वाघ यांनी ६ डिसेंबर २०१९ रोजी किरण पवार व शिवाजी पवार यांच्यासोबत बीडीओंची भेट घेतली. या वेळी त्यांनी अरेरावी करून हाकलून दिले. त्यानंतर गावातील ग्रामसेवक पद रिक्त असल्याने २८ डिसेंबर २०१९ रोजी वाघ यांनी पुन्हा बीडीओंची भेट घेतली. या वेळी त्यांनी अश्लील व जातिवाचक शब्द वापरले.
या प्रकाराला कंटाळून सरपंच मायाबाई वाघ यांनी २४ फेब्रुवारी २०२० रोजी सभापतींकडे सरपंचपदाचा राजीनामा दिला; मात्र सभापतींनी हा राजीनामा नामंजूर करून बीडीओंना माफी मागायला लावली. त्यानंतर वायाळ यांनी गावातील सदस्य राजेश धनराज गांगुर्डे, किरण दोधू शिरसाठ, मंगलाबाई प्रवीण सोनवणे यांना हाताशी धरून खोटे अर्ज देऊन चौकशी लावली.

यानंतर विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे, विस्तार अधिकारी अनिल राणे हे चौकशीसाठी आले. त्यांनी ५० हजारांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने त्यांनी वाघ यांचा खुलासा न पाहताच त्यांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवला. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२० रोजी सुनावणीसाठी बोलावले. त्यात माझ्यावर २०१७-१८ मध्ये शाळा दुरुस्ती व मुलींच्या शौचालय बांधकामात ५ लाख ७७१९७ रुपये अपहाराचा ठपका ठेवला होता. मात्र, वाघ या काळात सरपंच नसल्याचे लक्षात येताच त्याच तारखेला या अपहाराचा ठपका तत्कालीन सरपंच चेतना पवार यांच्यावर ठेवला. आरोप खोटे असल्याचे समोर येताच मायाबाई वाघांनी बीडीओ संदीप वायाळ, विस्तार अधिकारी एल.डी. चिंचोरे, अनिल राणे, सदस्य राजेश गांगुर्डे, किरण शिरसाठ, मंगलाबाई सोनवणे यांच्याविरुद्ध खंडणी, अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *