भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे वर्ल्ड रेकॉर्ड…


भाऊंच्या सृष्टीत 98 तासात 18 हजार चौरस फुटात साकारली भव्य कलाकृती

भवरलाल जैन.

जळगाव  (सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा आज – ( ता.25 ) पाचवा श्रद्धावंदन दिन आहे. कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करणाऱ्या भवरलालजींचे स्मरण त्यांच्या सान्निध्यात येणारी माणसं आणि त्यांच्या कर्तबगारीचा परिचय असलेली माणसंही आपआपल्या पद्धतीने गौरव करीत असतात. असाच एक सुंदर प्रत्यय म्हणजे एक मोजेक कलाकृती. जैन पाईप्सचा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ‘जैन व्हॅली’ परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे 150 फूट लांब व 120 फूट रुंद असे सुमारे 18 हजार चौरस फूट अशी मोठ्याभाऊंची भव्य  मोजेक प्रकारातील  कलाकृती साकारली. जागतिक नामांकन प्राप्त केलेली ही कलाकृती सलग 98 तासात साकार झाली आहे.  गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनीही याची नोंद घेऊन भवरलालजी जैन यांच्या श्रद्धावंदन दिनाच्या पूर्वसंध्येला याचे जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान केले. आज या कलाकृतीचे लोकार्पण झाले आहे.
ही कलाकृती कायमस्वरूपी स्थापित करण्यात आली असून, भाऊंच्या सृष्टीतील नयनरम्य अशा ‘भाऊंच्या वाटिके’त जागतिक विक्रम प्राप्त झालेली ही कलाकृती  प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाली आहे . भवरलालजी जैन यांनी कठोर परिश्रमाने बरडं माळरानावर हिरवी सृष्टी साकारली आहे. थेंबाथेंबाच्या बचतीतून भारताच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे, आदर्श कार्यसंस्कृती रचणारे द्रष्टा नेतृत्व ठरले आहे. त्यांनी श्रमाघामानं कोरड्या नक्षत्रांना हिरवाईचं लेणं दिलं. भूमिपुत्रांच्या चेहर्‍यावरचं हास्य हाच सर्वोच्च पुरस्कार मानला.
जैन पाईप्सचा वापर…
पाणी बचत आणि जैन पाईप हे समीकरण दृढ आहे; मोजेक आर्ट जैन पाईप्सच्या सुयोग्य आणि कलात्मक वापरातून साकारता येऊ शकते आणि जागतिक विक्रमसुद्धा त्यामुळे होऊ शकतो, हे भवरलालजी जैन यांच्या पोर्ट्रेटवरून सिद्ध झाले. काळा, करडा,  पांढरा या रंगांच्या पीई व पीव्हीसी पाईप्सचा उपयोग करून मनोहारी आणि भव्य कलाकृती साकारली आहे. भवरलालजी यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या उद्योजकीय कारकिर्दीचा पाया रचला त्या पाईप्सपासून मोजेक स्वरूपात ही कलाकृती साकार केली आहे. हेच ते पाईप्स जे आपल्या भूमीचं सिंचन करतात आणि आपल्या देशाची तहानही तृप्त करून तृषार्थाचा आशीर्वाद घेतात.
मोजेक आर्टसाठी दहा हजार पाईप
भवरलालजी जैन यांच्या पोर्ट्रेटसाठी पीई पाईप 25 मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले. दि.16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी 14 तास असे एकूण 98 तास अर्थात 5880 मिनिट, 352800 सेकंदात या मोजेक स्वरूपाची कलाकृती साकारली, या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास 21.9 किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते.
असा झाला पोर्ट्रेटचा जागतिक विक्रम…
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो. त्यानुसार ज्याठिकाणी विक्रम होत असतात अशा मोकळ्या जागेची निवड करण्यापासून तर ते पुर्ण होईपर्यंत व्हिडीओ चित्रण करण्यात येते. तसेच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद होताना तुकड्या तुकड्याने प्रत्येक व्हिडोओची बारकाईने नोंद घेण्यात येते. अशीच नोंद या पोर्ट्रेटसाठीसुध्दा घेण्यात आली. या जागतीक विक्रमाच्या नोंदीसाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने स्वप्नील डांगरीकर (नाशिक) व निखील शुक्ल (पुणे) या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मधील प्रत्येक रेकॉर्ड बघण्यासाठी प्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असतात परंतू ‘कोव्हीड-19’ परिस्थितीमुळे साकारत असलेली ही पुर्ण कलाकृती त्यांनी ऑनलाईन पाहिली. याशिवाय गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने जळगाव येथील आर्किटेक शिरीष बर्वे यांची सर्व्हेयर म्हणून नेमणूक केली होती. शिरीष बर्वे यांनी या कलाकृतीचे अवलोकन केले तसेच यातील संपुर्णत: तांत्रीक बाजू, मोजणी, साहित्य आदिंची पाहणी करून सत्यता पडताळली आणि निरीक्षणे नोंदवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डकडे सादर केली. त्यांच्यासह प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे हे या जागतिक विक्रमाचे साक्षिदार म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने नेमणूक केली होती. स्वप्नील डांगरीकर यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले.
विश्वविक्रमी कलाकृती सदैव प्रेरणा देणारी- अशोक जैन
”कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या जन्मदिनी ही कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रिडांगणावर साकारली होती. ती कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीत आता ही कलाकृती भव्य स्वरूपात साकारली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला जागतिक विक्रम हा खरोखरच आनंददायी आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण आणि प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहिल,’’ जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या भावना व्यक्त केल्या. 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *